पाकिस्तानच्या कारागृहांत ६८२ भारतीय कैदी, आणि भारताच्या ताब्यात ४६१ पाकिस्तानी कैदी आहेत.
पाकिस्तानच्या कारागृहांत ६८२ भारतीय कैदी आहेत. व भारताच्या ताब्यात ४६१ पाकिस्तानी कैदी आहेत. परदेशी उच्चायुक्तालयांतील समन्वय २००८ च्या करारानुसार भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यात परस्परांच्या ताब्यात असलेल्या देशांचे नागरिक आणि मच्छीमारांच्या यादीची देवाणघेवाण होते.
पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयाला पाकिस्तानच्या ताब्यातील ६८२ भारतीय कैद्यांची यादी दिली. (ज्यात ६३३ मच्छीमार आहेत.)
भारतानेही पाकिस्तानला आपल्या ताब्यातील ४६१ पाकिस्तानी कैद्यांची यादी दिली. (ज्यात ११६ मच्छीमार आहेत.)
२१ मे २००८ रोजी भारत-पाकिस्तानात झालेल्या ‘कॉन्स्युलर अॅक्सेस अॅग्रीमेंट’ नुसार या यादींची देवाणघेवाण होते.
भारतीय परराष्ट्र विभागाने पाकिस्तानला आवाहन केले आहे की, ५३६ भारतीय मच्छीमार व तीन भारतीय नागरिकांच्या कैदेची मुदत संपल्याने त्यांची मुक्तता करावी. म्हणजेच पाकिस्तानच्या ताब्यातील मुदत संपलेल्या भारतीय नागरिक, संरक्षण दलातील व्यक्ती आणि मच्छीमारांना मूक्त करण्यात यावे, असे आवाहन पाकिस्तानला करण्यात आले .
पाकिस्तान बद्दल :
भारताच्या वायव्य सिमेवरील देश आहे.
राजधानी : इस्लामाबाद
राष्ट्रीय चलन : पाकिस्तानी रुपया
नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अॅथलेटिक्समध्ये दुसऱ्या स्थानी.
ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अॅथलेटिक्समध्ये झालेल्या स्पर्धेत ८९.९४ मीटर अंतरासह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडून दुसरे स्थान मिळवले.
मात्र, तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत त्याला ९० मीटरचा टप्पा गाठण्यात थोडक्यात अपयश आले.
२४ वर्षीय नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.९४ मीटर अंतर पार करत आपला ८९.३० मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रम मोडला. हा विक्रम त्याने पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रस्थापित केला होता. ९० मीटर अंतरापर्यंत पोहोचण्यापासून तो अवघे सहा सेंटीमीटर दूर राहिला.
नीरजने आपल्या इतर प्रयत्नांत ८४.३७ मीटर, ८७.४६ मीटर, ८४.७७ मीटर, ८६.६७ मीटर आणि ८६.८४ मीटर अंतरावर भाला फेकला.
जागतिक विजेत्या आणि हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ९०.३१ मीटर अंतर भाला फेकत अग्रस्थान मिळवले. जर्मनीचा जुलिआन वेबर ८९.०८ मीटर अंतरासह तिसरा आला.
नीरज चोप्रा बद्दल :
नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेकपटू आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत त्याने जगभरातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळविली आहेत.
२०२० टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकले.
नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे.
मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा
दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चायनीज तैपेईच्या ताय झू यिंग कडून तीन गेममधील संघर्षांनंतर सिंधूचा पराभव झाला.
याचप्रमाणे थॉमस चषकातील भारताच्या जेतेपदाचा शिलेदार एच.एस. प्रणॉयची वाटचालसुद्धा संपुष्टात आली. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील जोनाटन ख्रिस्टीने प्रणॉयला २१-१८, २१-१६ असे पराभूत केले.
महिला एकेरीत सातव्या मानांकित सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या द्वितीय मानांकित ताय झूयिंग विरुद्धचा सामना २१-१३, १५-२१, १३-२१ असा गमावला. या सामन्यानंतर ताय झूयिंग हिने सिंधूविरुद्धचे विजयी वर्चस्व १६-५ असे राखले आहे. सिंधूने ताय झूविरुद्ध सलग सहाव्या सामन्यात पराभव पत्करला.
पी. व्ही. सिंधू बद्दल :
ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.
बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे. तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली.
रशियाने संवादकरून किंवा मुत्सद्देगिरीद्वारे युक्रेनशी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढावा. अशी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत केली.या दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि अन्नधान्य बाजारपेठेच्या सद्य:स्थितीसह जागतिक मुद्दय़ांवरही चर्चा केली, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे दिली आहे.
दोन्ही नेत्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये पुतिन यांच्या भारतभेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तसेच द्विपक्षीय व्यापाराला विशेषत: कृषी क्षेत्रातील उत्पादने, खते आणि औषध उत्पादन क्षेत्रात अधिक प्रोत्साहन कसे देता येईल, यावर विचारविनिमय केला.
या वेळी दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि द्विपक्षीय मुद्दय़ांवर नियमित संवाद सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली. पुतिन यांच्याशी चर्चेच्या काही दिवस आधी, मोदींनी ‘जी-७’ सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेत युक्रेन संघर्षांसंदर्भात भारत नेहमीच शांतता राखण्याचे समर्थन करेल, असे ठामपणे सांगितले होते.
रशिया बद्दल :
रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे.
राष्ट्रपती : व्लादीमीर पुतीन
प्रधान मंत्री : मिखाईल मिशुस्टिन (Mikhail Mishustin)
रशियाची राजधानी : मॉस्को (Moscow)
चलन: रशियन रूबल (Russian ruble)
देशातील वीजनिर्मिती प्रकल्पात मध्य रेल्वेने पुन्हा विक्रम केला आहे.
पावसाळय़ापूर्वी देशातील वीजनिर्मिती प्रकल्प आणि उद्योगांना आवश्यक कोळसा साठवता यावा, म्हणून विदेशातून आणलेला तसेच विदर्भातील खाणींमधील कोळसा वाहतूक करण्याचा मध्य रेल्वेने पुन्हा विक्रम केला आहे.
पावसाळय़ात कोळसा पुरेसा मिळत नाही. त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्पांकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोळशाचा पुरेसा साठा करून ठेवला जातो. शिवाय यावर्षी एप्रिल महिन्यादरम्यान अपुऱ्या कोळशामुळे वीजटंचाई निर्माण झाली होती. त्याचे खापर राज्य सरकारने केंद्रावर आणि रेल्वेवर फोडले होते. त्यामुळे रेल्वेने जून महिन्यात पुरेशा मालगाडय़ा उपलब्ध करून कोळसा वाहतूक योग्यप्रकारे व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यातून हा विक्रम झाला आहे.
मध्य रेल्वेने जून २०२२ मध्ये मुंबई विभागातील धरमतर बंदर साईिडग वरून आयातीत कोळशाची ३० मालगाडय़ांनी (रेक) तर नागपूर विभागाने या महिन्यात ९०१ मालगाडय़ांनी कोळशाची वाहतूक केली. या विभागात गेल्यावर्षी जून महिन्यात ७५४ मालगाडय़ांनी वाहतूक झाली होती. नागपूर विभागाने जून २०२२ या महिन्यात बल्लारपूर येथून लोहखनिजाची ६४ मालगाडय़ांनी वाहतूक केली.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने २१.६२ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली, तर एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत १८.५४ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली गेली होती. त्यात १६.६१ टक्के वाढ दिसून आली आहे.
ताडोबाच्या कोअर क्षेत्रात पर्यटकांना अडचणीं व धोका.
पावसामुळे व कच्चा रस्ता याकारणाने ताडोबाच्या कोअर क्षेत्रात (core area) पर्यटकांना अडचणीं व धोका असल्यामुळे १ जुलैपासून ताडोबाचे कोअर क्षेत्र पर्यटन सफारीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. ताडोबाचे गाभा क्षेत्र असलेले कोअर झोन दरवर्षी पावसाळ्यात तीन महिन्यांसाठी बंद करण्यात येते.
मात्र, ताडोबाच्या बफर क्षेत्रात (buffer area) सफारीला सुरुवात करण्यात आली आहे. बफर झोनच्या १३ प्रवेशद्वारावरून पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे ताडोबाच्या बाह्य क्षेत्रात पर्यटकांना पर्यटनांचा आनंद लुटता येणार आहे.
यामध्ये मोहर्ली बफर झोनमधील जुनोना, देवाडा, अडेगाव, आगरझरी, तर पांगडी बफर क्षेत्रातील पांगडी, अस्वल, चुहा, झरी, केसलाघाट, झरीपेठ, मामला आणि कोलारा बफरझोनमधील कोलारा, चारूरदेव, अलिझंजा, मदनापूर, शिरखेडा, तसेच नवेगाव बफरमधील नवेगाव, रामदेगी, निमडेला या १३ प्रवेशद्वावरून पर्यटकांना सफारी करता येणार आहे. बफर क्षेत्राच्या पर्यटनासाठी पर्यटकांना ऑनलाईन अथवा प्रवेशद्वारावर जाऊन नोंदणी करता येणार आहे. ताडोबाच्या कोअर क्षेत्रात मार्च २०२२ ते मे २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८० हजार पर्यटकांनी भेट दिली आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान बद्दल :
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली झाली.
हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. काही काळापूर्वी या उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तिकरण होऊन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनची १८ जुलै तारीख जाहीर झाली आहे.
१८ जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणारआहे. आणि १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे.
लोकसभा सचिवालायाने प्रसिद्धीपत्रक जारी करत अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष कोणकोणत्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
अधिवेशनात देशभरातून विरोध केल्या जाणाऱ्या अग्निपथ योजनेवरून हंगामा होण्याची शक्यता आहे. व देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ सारखे अनेक प्रश्न अधिवेशनात मांडले जाऊ शकतात.
गेल्या वर्षी शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ विषयांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाने सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र, केंद्र सरकारने ती परवानगी नाकारली त्यामुळे विरोधी पक्षांनी अधिवेशनात गदारोळ घातला होता. यामुळे गेल्या वर्षीचे पावसाळी अधिवेशनही विविध विषयांनी चांगलेच गाजले होते.
अग्निपथ योजनेबद्दल :
इंडियन आर्मी ने सुरू केलेल्या या नवीन अग्निपथ योजनेअंतर्गत आपल्या देशातील तरुणांना चार वर्षासाठी सैन्यात काम करता येईल.
अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर असे म्हटले जाणार आहे.
त्याचबरोबर अग्निपथ योजना 2022 अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना आर्थिक मानधन आणि सोयी सुविधाही दिल्या जाणार आहेत.